Sunday 21 June 2020

जी

माझे वडील आम्ही त्यांना जी म्हणायचो. दिसायला देखणे, इतर भावंडात उठून दिसणारे म्हणजे आमचे जी. माझ्या वडिलांनी कधी काही शौक बाळगलेला मला कधी आढळला नाही. कधीकाळी विडी ओढायचे म्हणे पण एके दिवशी आमचा मोठा भाऊ लहान असताना वडिलांनी फेकून दिलेले विडीचे थोटुक
नकल म्हणून तोंडाला लावले. तेव्हापासून वडिलांनी विडी ओढणेही सोडून दिले. माझे वडील इतर वाईट गोष्टींपासून दूरच राहिले. विचारी, सरस उलगडलेले व्यक्तिमत्व. त्यावेळेस जेव्हा महारांच्या पोरांना वरील जातीस मिळण्यास सुद्धा वाव नव्हता तेव्हा माझे वडीलांच्या यादीत बामण, कुणबी, वाणी इ. मित्रांचा समावेश होता. म्हणून माझे आजोबा म्हणायचे, "मोठ्याची संगत (माझे मोठे वडील) जुगारी, दारुड्या पोरांशी, लाह्याण्याची उन्हाळ, तापरट पोरांशी, पण मंडोटाची (वडील) बामना, तांब्याच्या पोरांशी."

जेमतेम पाचवी शिकलेले माझे वडील पण नाना विषयांवर जणू त्यांची घट्ट पकड. गावात त्यांना विशेष मान. बाहेर गावा कडील मंडळी कधी लग्नाला आली की बसायचे वडिलांना घेरून आणि चालायची विचारांची देवाण घेवाण. कधी वडील रामायणातील तर कधी इतर ग्रंथातील दाखले द्यायचे तेव्हा ऐकणारे मंत्रमुग्ध होत. जेव्हा कुणाच्या मरणावर स्मशानभूमी वर गेल्यावर शव गाळायला वेळ असल्यास वडीलांच्या व इतर पाहुणे मंडळी, गावकरी यांच्या गप्पा रंगायच्या. विचारांची इतंभूत सरणी.

वडील शाहिरही होते. त्यांना गण पाठ, सवाल- जवाब मध्ये वरदहस्त. पण त्यांनी हे कधीचेच सोडून दिलेले. माझ्या प्रत्यक्षात एकदा त्यांना सवाल जवाबात बक्षीस मिळालेले मी बघितले आहे.

वडिलांची ओळख राजनेच्यांशीही होती पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला नाही. रा. सू. गवई साहेबांसाठी तर म्हणे खांद्यास खांदा लावून मदत केली होती. जेव्हाही मतदान आले तेव्हा राजकारणी मंडळी भलेही मग ती कोणत्याही पक्षाची असो आपसूकच वडिलांकडे हात जोडत यायच्या.

असो, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा घरची परिस्थिती जेमतेम होती. माझे मधले भाऊ यांनी अंडी विक्री चालू केली होती. शुक्रवारचा मोठा बाजार. खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांसाठी घराच्या बाजूलाच अंडी घेऊन भाऊ बसलेला. आमचं घर रस्त्याच्या कडेलाच आहे. त्यावेळेस कशी तरी पोलीस स्टेशन ला खबर मिळाली की आमच्या गावात जेथे अंडी विकत आहेत तेथे त्या घरात मोहाची दारू सुद्धा विकणे चालू आहे. ही बातमी खरी होती पण ते घर आमचे नव्हते. साधारणतः शे दोनशे मीटरच्या अंतरावर अजून एक अंडीचे दुकान होते a तेथल्या घरात दारू मिळत असे. पण जे नव्हतं व्हायचं तेच झालं. काही शिपूर्डे येऊन सरळ घरात घुसले व मोरीत, टाक्यात त्यांनी शोधाशोध चालू केली. हा हा म्हणता म्हणता ही गोष्ट गावभर पसरली. इतरांसोबत माझे वडील घरी पोहोचले. पोलिसांच्या अनैतिक आचारमुळे लोकं त्यांना मारायला बघत होते पण वडिलांनी त्यांना रोखून धरले. चौकशी केली व गैरसमज दूर केला. पण कशे काय माहीत ही बातमी आमदारापर्यंत पोहोचली. लागलीच त्यांनी सब इन्स्पेक्टर ला फोन करून खळसावले व तडका फडकी त्यांची बदली करण्यात आली. अहिंसेची ताकद काय असते हे त्या क्षणी जाणले. जर का पोलिसांशी मारहाण झाली असती तर घटनेला वेगळेच वळण लागले असते. पण तो प्रसंगावधान वडीलांच्या अंगी वळणी होता.

जेव्हा समाजाने १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा आजोबांनी सर्व देवी देवतांना नदीत विसर्जित केले व वडिलांनी स्वतःला समाजकार्यात ओवून टाकले.

आमचे गाव महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या सीमेपासून थोड्याफार अंतरावर आहे. आमची जास्तीत जास्त गोतावळ ही तिथलीच. त्यावेळेला तेथे आमच्या समाजाला छेडले जायचे. जेव्हा कुणी मेलेले ढोर उचलण्यास मना करायचे त्यांची हयगय केली जायची नाही. पण वडिलांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने तर कधी रिपब्लिकन पक्षाचे सहकार्याने मुलताई तालुक्यातील जवळ जवळ सर्वच गावात जाऊन समाजाचं मनोधैर्य खचू दिले नाही. कधी प्रशासनाची तर कधी पक्षाची साथ घेऊन जातीयतेला लढा देतच राहिले.

गावात तंटामुक्त समितीचे सभापती म्हणून त्यांनी गावाला तृतीय पारितोषिक मिळवून दिले. आम्ही आता कमावते झालो होतो. परिस्थिती सुधारलेली होती पण वडिलांची प्रकृति ढासळत चालली होती. आम्ही त्यांना म्हणायचो बास्स झालं आता आराम करा पण ते ऐकत नव्हते. वडिलांना आजूबाजूला इतर लोकं असले म्हणजे गमायचे. त्यांना गप्पा गोष्टी ची जणू आवडच. मग इतरांना कधी चहा पाणी, तर कधी पान सुपारी यासाठीही मागेपुढे बघायचे नाही. यावरून कित्येकदा तरी आई रागवायची. मला त्यांची ही सवय माहीत असल्याने जेव्हा कधी घरी यायचो तेव्हा त्यांच्या हातात चार पाचशे रुपये टाकून जात असो.

पण अचानक त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्यांनी अंथरूण धरले. त्यांच्या शेवटच्या क्षणी रात्री फोन आलेला की श्वास घेण्यास त्रास होत आहे पण आई सोबत हे पण म्हणाली की लगेचच निघू नकोस. कारण माझ्या पत्नीस आठवा महिना सुरू होता. म्हणून शेवटच्या दर्शनास मी मुकलो.

गावात ही धारणा की जर बायको गरोदर असताना नवऱ्याने कुणा मयतला खांदा दिला की बायकोचे बाळंतपणात फार हाल होते म्हणून कुणी मला वडीलांच्या मयतीला खांदा पण देऊ दिला नाही. त्या अंधश्रध्देच्या मी बळी पडलो होतो. त्याची साल, दुखः आजही जाणवते. वडिलांशी कित्येकदा भांडणारा, तर्क कु तर्क करणारा मी त्यांच्या मरणावर धाय मोलकून रडत होतो. छत गेलेलं वाटत होतं.

बऱ्याच दिवसांनी मध्य प्रदेशच्या एके गावी जाणे झाले. तेथे काही जुन्या वडीलधारी मंडळींनी माझी विचारपूस केली. वडिलांचे नाव सांगताच ते म्हणाले, "अगा हे नेताजी चं पोर हाय." नकळत कॉलर ताठ झाली. या जागतिक पिता दिनास त्या नेताजींना कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏

8 comments:

  1. सर,खुप भावनास्पर्शी लेखन .' आमचे बाप आणि आम्ही ' डॉ. नरेंद्र जाधव साहेबांचे पुस्तक आठवले..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर पण ही फार मोठी तुलना केली आपण..

      Delete
  2. यह वास्तव में मेरा प्रिय भाई है

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाई।🙏

      Delete
  3. यह वास्तव में सच है, मेरे प्यारे भाई

    ReplyDelete
    Replies
    1. हां भैय्या.. मैंने जो कुछ देखा या सुना था वो ही लिखने का प्रयास किया है।

      Delete
  4. सहसा ही सारी अविस्मरणीय स्थिति जेहन में ताजा हो गई.
    जी को सादर प्रणाम.,������

    ReplyDelete